। रसायनी । वार्ताहर ।
तहसील कार्यालय खालापूर, उरण सामाजिक संस्था आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वावर्ले येथे कातकरी समाजातील लोकांच्या जातीचे दाखले व रेशनकार्ड काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला व आदिवासी समाजात समाधानाचे वातावरण तयार झाले. उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार कल्याणी मोहिते, नायब तहसीलदार जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ निरीक्षक किरण पाटील, प्रा.मढवी, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या सहकार्याने ग्रुप ग्रामपंचायत वावर्ले हद्दीतील सहा कातकरी वाड्यांवर राहणार्या कातकरी बांधवांचे जातीचे दाखले व रेशनकार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण येथून आदिवासी विकास निरीक्षक जगदीश भानुशाली यांनी आवश्यक मार्गदर्शन करून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकल्प अधिकारी पवार, आनंद पाटील, कैलास चव्हाण, पूर्णा पाटील, मनीषा ढवळे, जगताप, संजय ठाकरे, मुगदन, अजित जाधव, पांपटवार, अमोल बोराडे, प्रवीण परदेशी यांच्या सहकार्याने कॅम्प आयोजित करून आदिवासी बांधवांचे पैसे, वेळ व शारीरिक, मानसिक त्रास वाचविण्यात येईल असे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सांगितले. ज्यांनी सहकार्य केले त्यांचेही आभार व्यक्त केले.