आपत्तीत पोलीस पाटलांनी सतर्क राहावे

पोलीस निरीक्षक अनिल विभुतेंचे आवाहन
| रसायनी | वार्ताहर |

सुरू झालेल्या पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीत गाव पोलिस पाटील यांनी सतर्क राहून जनतेची काळजी घ्यावी, पोलिस दल आपल्याला सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्‍वासन खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिले. रविवारी खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील गाव पोलीस पाटील यांची बैठक नेताजी पालकर सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.


मान्सून कालावधीत करावयाचे उपाययोजना, नदी, धरणे धबधबे, तलाव या ठिकाणी होणारे अपघात, तसेच येणारे पर्यटक यांना विशेष सूचना देण्याबाबत व धोकादायक ठिकाणी फलक लावण्यात यावे, आपत्कालीन व्यवस्थापन तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार्‍या साधनसामुग्रीचा वापर कशाप्रकारे करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सायबर क्राईम, आगामी सण-उत्सव (बकरी ईद व आषाढी एकादशी) निमित्ताने गावात शांतता प्रस्थापित करणे, एकत्रित येऊन सणवार साजरे करणे, जातीय व धर्मांध सलोखा बिघडू नये यासाठी प्रयत्न करणे, गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे व त्याबाबत जनजागृती करणे, गावातील एकाकी राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घेणे याबाबत योग्य त्या सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे पाटील यांच्यासह गाव पोलीस पाटील हजर होते.

Exit mobile version