| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील करंजाडे परिसरात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले. विशेष म्हणजे, जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन ॲम्बुलन्सची प्रतीक्षा न करता त्याला तात्काळ खाजगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रदीप दास (41) असे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव असून, ते करंजाडे येथील रहिवासी आहेत. ते पळस्पे ते अटल सेतू मार्गावर रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली. उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यांनी जखमीची अवस्था गंभीर असल्याने ॲम्बुलन्सची वाट न पाहता त्याला तातडीने खाजगी वाहनातून उपचारासाठी एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे रवाना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घटनेची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना दिली.
अपघातग्रस्ताला पोलिसांची जीवनदायी मदत
