| नेरळ | वार्ताहर |
नेरळ परिसरातील अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याचे सर्रास पाहायला मिळत आहे. मटका तर अनेक भागात खुलेआम सुरु असल्याचे निदर्शनास येते. अश्याच नेरळ गणेश घाट परिसरातील ऑनलाईन जुगार सुरु असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर जागेवर छापा टाकला असून, तेथून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्याच्या या कामाचे सर्वच ठिकाणी कौतुक होत असून, पोलीस अधीक्षक पाहिजेत तर असे अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. अधीक्षक आंचक दलाल यांच्या आदेशानुसार मटका, जुगार आणि सट्टेबाजीसारखे गैरप्रकार काही भागात पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. परंतु, नेरळ सारख्या शहरात हे कुठे कमी होताना दिसत नाही. ही करवाई नेरळ गणेश घाट परिसरातील राजमाता जिजाऊ तलावाजवळ करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, पोलिसांनी कारवाई दरम्यान 15 हजार रुपयांचा मुद्देमाल, त्यात दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार नेरळ पोलिसांकडून दाखल करण्यात आली असून, पोलीस हवालदार वाघमारे हे पुढील तपास करत आहेत.







