चार महिलांसह चौघे ताब्यात
। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर-कामठी मार्गावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या ‘रेव्ह पार्टी’चा पोलिसांनी भंडाफोड केला असून याप्रकरणी चार जणांबरोबर चार महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-5, सामाजिक सुरक्षा विभाग व एएचटीयू पथकाने ही कारवाई केली.
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस. फार्म येथे शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यानंतर पार्टी सुरू असल्याची तसेच त्या ठिकाणी अमली पदार्थांचा वापर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने सामाजिक सुरक्षा पथकासह त्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना या ठिकाणी काही प्रमाणात एम.डी हे अमली पदार्थ आढळून आले. आरोपी अमली पदार्थांचे सेवन करत होते. याप्रकरणी पोलिसांनी सुनील अग्रवाल (61), गौतम जैन (51), नीलेश गडिया (61), मितेश खक्कर (48) यांना तात्काळ अटक केली. तसेच, त्यांच्यासोबत असलेल्या चार महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी 1.31 ग्रॅम एमडी पावडर, हुक्का पॉट, रोख 58 हजार, सहा मोबाईल, दोन कार असा 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरोधात एनडीपीएस तसेच कोटपा अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.