। कळंबोली । प्रतिनिधी |
मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने नवीन पनवेल येथील पूजा कॉम्प्लेक्समधील ‘हेवन थाई स्पा’वर धडक कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत केलेल्या या कारवाईत मिझोराम आणि मणिपूर राज्यातील पाच महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री केली. माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलिसांनी स्पावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना पाच महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात या महिला मिझोराम आणि मणिपूर राज्यातील असल्याचे समोर आले आहे. या महिलांना या व्यवसायात आणण्यामागे नेमके कोण आहे, तसेच या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, फरार असलेल्या एका आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा आस्थापनांच्या कारभारावर पोलिसांकडून अधिक कठोर नजर ठेवली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खांदेश्वर पोलीस करीत आहेत.







