नवी मुंबईतील ‘स्पा पॅलेस’ सेंटरवर पोलिसांचा छापा

। पनवेल । प्रतिनिधी ।

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात सर्व काही नेहमीसारखंच सुरू होतं लोक आपल्या कामात व्यस्त, रस्त्यांवरची वर्दळ आणि एका स्पा सेंटरमध्ये चालणारी शांत हालचाल. बाहेरून पाहता सर्व काही व्यवस्थित वाटत असलं, तरी आत मात्र एक वेगळंच वास्तव लपलेलं होतं.

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला एक गुप्त माहिती मिळाली. स्पा पॅलेस नावाच्या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची खबर मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने लगेचच योजना आखली. एक बनावट ग्राहक त्या स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आला. काही वेळातच त्या ग्राहकाकडून मिळालेल्या सांकेतिक इशाऱ्याने सर्व चित्र स्पष्ट झाले आणि क्षणातच पोलिसांनी धाड टाकली. स्पाच्या आत जे दृश्य दिसले, ते धक्कादायक होते. 7 महिलांना जबरदस्तीने या धंद्यात अडकवण्यात आले होते. त्यांना मसाजच्या नावाखाली ग्राहकांसमोर उभं केलं जात होतं. या सगळ्यामागे होती स्पाची मॅनेजर नितू हजारीलाल प्रजापत. ती महिलांना कामाच्या नावाखाली आणून, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होती. प्रत्येक ग्राहकाकडून हजारो रुपयांचा मोबदला घेतला जात होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व महिलांची सुटका केली आणि आरोपी मॅनेजरला अटक केली. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये 4 थायलंडमधील, 2 मिझोराम आणि 1 मणिपूर येथील महिला असल्याचे समोर आले. या संपूर्ण कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अनैतिक धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version