| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई पोलिसांनी देहव्यापारातून 6 पीडित महिलांची सुटका केली आहे. स्पा सेंटरमध्ये स्पा सेवांच्या नावाखाली देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने डमी ग्राहक पाठवून छापा टाकला. या कारवाईत स्पा मालक आणि 2 मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या एपीएमसी परिसरात अलमो स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांना जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी प्लान आखत सापळा रचला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने डमी ग्राहक त्या ठिकाणी पाठवला. त्यांनी डमी ग्राहकाद्वारे पुरावे गोळा केले. पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे तिथे धडक कारवाई केली. तसेच 6 पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, स्पा सेंटरच्या इतर संबंधितांची चौकशी सुरू आहे.