वाहनांच्या लांबच लांब रांगा
। मुंबई । प्रतिनिधी ।
सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने नागरिक घराबाहेर पडले असून मुंबई-पुणे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. सकाळपासूनच वाहतूक मंद गतीने सुरू होती, मात्र दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, ती कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पुणे लेनवर तात्पुरते 15 मिनिटांचे ब्लॉक लावले आहेत. मात्र, त्यानंतरही वाहतूक सुरळीत होण्यात अडचणी येत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
खा. सुप्रिया सुळेही वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या
लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमध्ये सर्वसामान्यांसह खासदार सुप्रिया सुळे या देखील अडकल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्या स्वतः वाहतूक कोंडीत अडकल्या असल्याचे सांगताना दिसत आहेत. तसेच, शेजारील वाहनचालकांशी संवाद साधत “दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलो आहोत,” असे त्या म्हणताना दिसतात. काही वाहनचालकांनीही सकाळी सात वाजता निघूनही अजून मार्ग मोकळा न झाल्याची व्यथा व्यक्त केली.







