| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील दुन्द्रेपाडा येथील एका फार्महाऊसमधील तरण तलावात तीन वर्षांच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. रुद्र विशाल बोदडे (3) असे या बालकाचे नाव असून, या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विशाल बोदडे (बुलढाणा) आणि त्यांची पत्नी पूर्वी फार्महाऊसमध्ये केअरटेकर म्हणून काम करतात. मुलाचे वडील विशाल बाहेर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगा फार्महाऊसवर होते. सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास रुद्र खेळता खेळता तरण तलावात पडला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना उशिरा विशाल यांच्या पत्नीच्या लक्षात आली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.