रायगडात 40 टँकरने पाणीपुरवठा
| अलिबाग | प्रमोद जाधव |
जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खुपच कमी झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना विशेषकरून महिलांना दीड ते दोन किलो मीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. एक लाख 11 हजार 231 नागरिकांना पाण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. पाण्याच्या टंचाईशी सामना करण्यासाठी 279 ठिकाणी 40 टँकरद्वारे प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील वाढते नागरिकीकरण, औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली. ग्रामपंचायतीमध्ये गावांचा विस्तार वाढल्याने ग्रामपंचायतींना मुबलक पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. मे महिन्याच्या सुट्टीत गावी येणाऱ्या नागरिकांनादेखील पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. रायगड जिल्ह्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागागद्वारे या योजनेची हजारो कामे घेण्यात आली. विहीरींपासून संपवेल, पाईप टाकणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यात आली. एकाच ठेकेदाराला दोन ते तीन कामे देण्यात आल्याने काही ठेकेदारांकडून ही कामे पुर्ण झाली नाही. रायगड जिल्ह्यामध्ये करोडो रुपये खर्च करून जलजीवन योजना राबविण्यात आली. काही ठिकाणी जलजीवन योजनेचे काम पुर्ण होऊनही नळांना पाणी नाही. काही ठिकाणी योजनेचे कामच अपूर्ण स्थितीत आहे. तर काही ठिकाणी ठेकेदारांना कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी काम बंद ठेवले आहे. त्यामुळे प्रति माणसी प्रति 55 लिटर पाणी मिळण्याचे स्वप्न जिल्ह्यातील नागरिकांचे भंगले आहे.
जिल्हयात धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. धरणांमधून पाणी कमी मिळत असल्याने दोन ते तीन अथवा पंधरा दिवस पाण्याची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येऊ लागली आहे. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. काही ठिकाणी मध्यरात्री, पहाटे पर्यंत जागरण करून पाणी भरण्याची वेळ महिलांवर येत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, माणगांव, महाड, पोलादपूर, व श्रीवर्धन या दहा तालुक्यांतील 41 गावे, 238 वाड्या अशा एकूण 279 ठिकाणी पाण्याचा दुष्काळ सुरू झाला आहे. या गावे, वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.
मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता
रायगड जिल्हयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. जिल्हयातील अलिबागस अनेक तालुक्यात अवकाळी सुरू आहे. येत्या चार दिवसांत 24 मेपर्यंत जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 30- 40 किलो मीटर असू शकतो. काही ठिकाणी जास्त असू शकतो, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत काळजी घ्यावे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पिण्यासाठी विकतचे पाणी
जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. अलिबागनंतर वेगवेगळ्या तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. धरणांमधून मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणी विकतचे घ्यावे लागत आहे. वीस लीटर पाणी 50 ते 60 रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे महिन्याला दीड ते तीन हजार रुपये मोजण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पिण्यासाठी काहीजण विकतचे पाणी घेत आहेत. काही ठिकाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारल्याने महिन्याला दोनशे तीनशे रुपये भरून त्या केंद्राद्वारे पाणी घेत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पाच तालुके टँकर मुक्त
रायगड जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. रोहा, सुधागड- पाली, मूरूड , तळा, म्हसळा या तालुक्यात अद्यापपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे हे पाच तालुके टँकरमुक्त असल्याचे चित्र आकडेवारीनुसार दिसून येत आहे. मात्र या तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
तालुके | गावे | वाड्या | एकूण | टँकर | बाधित लोकसंख्या |
अलिबाग | 03 | 00 | 03 | 02 | 6479 |
उरण | 00 | 04 | 04 | 01 | 640 |
पनवेल | 04 | 14 | 18 | 10 | 16478 |
कर्जत | 01 | 00 | 01 | 01 | 846 |
खालापूर | 02 | 01 | 03 | 02 | 1478 |
पेण | 12 | 83 | 95 | 10 | 48364 |
माणगांव | 02 | 03 | 05 | 02 | 1447 |
महाड | 11 | 116 | 127 | 09 | 30046 |
पोलादपूर | 05 | 10 | 15 | 02 | 1540 |
श्रीवर्धन | 01 | 07 | 08 | 01 | 3913 |
एकूण | 41 | 238 | 279 | 40 | 111213 |