चेन्नई किंग्सचा दहावा पराभव
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग 2025 चा शेवट गोड केला आहे. अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी दणदणीत विजयाची नोंद करत चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचे पाणी पाजले आहे. राजस्थानच्या यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी व संजू सॅमसन यांनी दमदार सुरुवात करून चेन्नईला बॅकफूटवर फेकले. आणि, हा सामना सहज जिंकून स्पर्धेचा निरोप घेतला.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईच्या आयुष म्हात्रेने दमदार सुरूवात करून देऊनही अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. डेव्हॉन कॉनवे (10), उर्विल पटेल (0), आर. अश्विन (13) व रवींद्र जडेजा (1) हे स्वस्तात बाद झाल्याने चेन्नईचा संघ अडचणीत सापडला. आयुषने 20 चेंडूंत 43 धावांची खेळी केली. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसने 25 चेंडूंत 42 धावा केल्या. शिवम दुबने 39 धावा केल्या; परंतु, त्यांना वेग नव्हता. महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा संथ खेळी केली आणि 17 चेंडूंत 16 धावा करून तोही माघारी परतला. राजस्थानच्या गोलंदाजांनी शेवटच्या 3 षटकांत फक्त 17 धावा देत चांगले पुनरागमन केले आणि चेन्नईला 8 बाद 187 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. यावेळी राजस्थानच्या युधवीर सिंग व आकाश मढवाल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर, तुषार देशपांडे व वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
चेन्नईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करताना 19 चेंडूंत 36 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने मोर्चा सांभाळला. तो राजस्थान रॉयल्सकडून 4 हजार आयपीएल धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. त्यांनतर वैभव सूर्यवंशी संयमी खेळ करताना दिसला. वैभवने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वैभव व संजू यांनी 59 चेंडूंत 98 धावांची भागीदारी केली. परंतु, संजू 41 व वैभव 57 धावांवर बाद झाला. ही दोघे बाद झाली तेव्हा राजस्थानला 36 चेंडूंत 50 धावांची गरज होती. राजस्थानचा कर्णधार रियान परागला 3 धावांवर बाद करून चेन्नईने सामन्यात थोडी रंगत आणली होती. मात्र, 17व्या षटकात ध्रुव जुरेल व शिमरोन हेटमायर यांनी 18 धावा चोपून सामना एकतर्फी केला. जुरेलने 18व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून राजस्थानचा विजय पक्का केला. राजस्थानने 17.1 षटकांत 4 बाद 188 धावा केल्या. जुरेल 31 धावांवर नाबाद राहिला. यावेळी चेन्नईचा गोलंदाज आर. आश्विनने दोन बळी घेतले. तर, अंशुल कंबोज आणि नुर अहमय यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.