शासन दरबारी चपला झिजवूनही पदरी निराशा
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करतो आहे. मात्र, पेण तालुक्यातील जयभीम नगर मुंगोशी बौद्धवाडी सारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतो आहे. या गावाला हक्काचा रस्ताच नाही, ही मोठी शोकांतिका आहे. या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासनदरबारी चप्पला झिजवल्या पण रस्ता काही मार्गी लागलाच नाही. रस्त्या अभावी गावकऱ्यांचे अतोनात हाल होता आहेत. यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांनी रस्ता द्या, नाहीतर जीव घ्या, अशी विनवणी शासनाला केली आहे.
येथील विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण व वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुट्याची व खडतर वाट तुडवत जावे लागते. पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होते. सर्प व कीटक यांपासून त्यांच्या जीवाला धोका जाणवतो. रस्त्याअभावी येथील मुले शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर घर सोडून इतरत्र राहता येत. तर गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंगोशी गावापर्यंत येण्यासाठी येथील रुग्ण व गर्भवती महिलांना झोळीतून आणण्याची नामुष्की ओढवते. रस्त्यासाठी अनेकदा लढे आंदोलन उपोषण झाली. मात्र, रस्त्याच्या प्रश्नावर तालुका व जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचेच दिसून आले. रस्त्याअभावी जयभीम नगर मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणी व संकटांना सामोरे जावे लागते, अशावेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारला आहे. अनेक प्रयत्नाअंती भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगाने जागेची मोजणी करण्यात आली. लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून गावकऱ्यांना सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. जर रस्त्याचा प्रश्न जलदगतीने सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी बोलताना रिपब्लिकन सेनेच्या रायगड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आश्विनी ठाकूर म्हणाल्या की, मुंगोशी बौद्धवाडी आपल्या पायाभूत व मूलभूत नागरी सुविधांपासून अनेक वर्षे वंचित आहेत. हक्काच्या रस्त्यासाठी मागील अनेक पिढ्या संघर्ष करीत आहेत, त्यांच्या लढ्याला आता रिपब्लिकन सेनेने साथ दिली आहे. अतिशय खडतर वाट चालून हे ग्रामस्थ एक एक दिवस ढकलत आहेत, आम्ही या रस्त्याच्या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते. आज जागेची मोजणी झाली मात्र पुढील रस्ता होणेकामी प्रशासनाने, मुंगोशी ग्रामस्थांनी सकारात्मक पाऊले उचलावीत अशी मागणी करीत आहोत.
रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड म्हणाले, की बौद्ध वस्ती ही मागील अनेक शतके गाव कुसा बाहेरचे जीवन जगत आहे. आजही परिस्थिती काही वेगळी दिसत नाही, मुंगोशी बौद्धवाडी ही मुख्य गावाबाहेर वसलेली असून गावात जाण्यासाठी रस्ताच नाही ही शोकांतिका आहे. आम्ही हा लढा लढतोय आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवू व ग्रामस्थांना त्यांचा संविधानिक अधिकार मिळवून देऊ असे गायकवाड म्हणाले.