रोशन क्रिकेट अकॅडमी अजिंक्य
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तेवीस वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाने अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रोशन क्रिकेट अकॅडमी संघाने पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघावर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवत स्पर्धेची चॅम्पियनशिप पटकावली आहे.
पेण संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या अंतिम सामना 27 मे रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळविण्यात आला होता.अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना रोशन क्रिकेट अकॅडमी संघाने 38.4 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 204 धावा काढल्या त्यामध्ये विघ्नेश देशमुख यांनी सर्वाधिक 50 धावा काढल्या तर आर्यन पालांडे 34 रॉबिन वेल 27 धावा काढून संघाला योगदान दिले. पेण स्पोर्ट्सकडून हारदेव सिंह यांनी 4 श्रवण वडे यांनी बहुमूल्य 2 फलंदाज बाद केले. प्रतिउत्तर देताना पेण स्पोर्ट्स संघाने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली, नील कोळी- 56, हर्ष म्हात्रे- 33, निखिल भोईर यांनी 32 धावांची खेळी संघासाठी केली.
जिंकण्यासाठी शेवटच्या 3 धावा हव्या असताना संघाचे सर्व गडी बाद झाले. रोशन क्रिकेट अकॅडमीकडून कर्णधार यश झावरे यांनी 5 पार्थ केसकर 3 व रॉबिन वेल यांनी 2 फलंदाज बाद करून संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून पेण स्पोर्ट्स संघाचा अष्टपैलू खेळाडू श्रवण वडे, उत्कृष्ट फलंदाज करण बोराडे, उत्कृष्ट गोलंदाज ओम कांबळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यश झावरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.







