पहिल्या दिवशी पावसाने मैदान मारले

पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली
उमेदवारांची घेतली शारीरिक मोजमापे

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाईसह बॅन्डस्‌‍मन आणि चालक या पदासाठी शुक्रवारपासून मैदानी चाचणीला प्रारंभ होणार होता. परंतु, मागील दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने मैदानावर पाणी साचले आहे. परिणामी, पहिल्याच दिवशी होणारी मैदानी चाचणी पावसाच्या अडथळ्यामुळे उमेदवारांच्या सुरक्षेखातर रद्द करण्यात आली. मात्र, यादरम्यान उमेदवारांची शारीरिक मोजमापणी घेण्यात असून, प्रत्यक्ष मैदानी चाचणी एक जुलैपासून घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

पोलीस होण्यासाठी गेल्या वर्षभरापासून तरुण-तरुणींनी सराव सुरू ठेवला होता. वेगवेगळ्या अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पोलीस भरतीची तारीख कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा संपली. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगत 31 हजार 63 उमेदवारांनी अर्ज भरले होते. रायगड पोलीस दलातील 422 जागांसाठी ही भरती आहे. शुक्रवारी (दि. 21) पासून 21 जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची तयारी सुरु केली. त्यासाठी लागणारी यंत्रणादेखील तैनात करण्यात आली. सुमारे 250 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची यासाठी नेमणूक करण्यात आली होती.

नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये मैदानी चाचणी घेण्याची तयारी करण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार सुरूवात केली. या पावसामुळे जिल्हा क्रीडा संकुलमधील मैदानात पाणी साचले असून, धावपट्टीमध्ये चिखल तयार झाला आहे. त्यामुळे मैदानी चाचणी न घेता शारीरिक मोजमाप घेण्यात आले. त्यामध्ये पुरुष उमेदवारांची उंची, छातीची तपासणी करण्यात आली.

चुकीचा मार्ग स्वीकारू नका
पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. पोलीस होण्यासाठी काही मंडळींकडून आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. काहींकडून पैशाची मागणी केली जाईल. जो कोणी चुकीच्या मार्गाने पोलीस होण्याचा प्रयत्न करताना आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी यंत्रणा तैनात केली आहे. पोलीस होण्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारू नका, असा मोलाचा सल्ला पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
भरती पुढे ढकला
पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. या हंगामात पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. या कालावधीत मैदानी चाचणी देताना प्रचंड त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी यावेळी उमेदवारांनी भरतीच्यावेळी केली.
मैदानी चाचणी एक जुलैला
रायगड पोलीस दलातील मैदानीला चाचणीला शुक्रवारी सुरुवात करण्यासाठी तयारी करण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उमेदवारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी मैदानाची चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामध्ये धावणे, गोळा फेक व इतर मैदानी चाचणी एक जुलैला घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
वेबसाईटवर उमेदवारांना माहिती मिळणार
पोलीस दलातील भरतीला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा हंगाम आहे. त्यामुळे उमेदवारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. प्रत्येक उमेदवारांना रायगड पोलिसांच्या raigadpolice.gov.in या वेबसाईटवर माहिती दिली जाणार आहे.
Exit mobile version