| अलिबाग | प्रतिनिधी |
पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वैभव खेडकर रा. बीड व पुरभा गायकवाड रा. हिंगोली या दोन आरोपींची नावे आहेत. नऊ महिन्यापूर्वी रायगड पोलीस दलातील शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालयात पार पडली. त्यावेळी उमेदवारांकडून कागदपत्रे जमा करण्यात आली. भरतीमध्ये या दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला दिला होता.
दरम्यान गडचिरोली येथे पोलीस भरतीमध्ये बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकाने बीड व हिंगोली येथे जाऊन महसूल विभागाशी संपर्क साधून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी ही दोन्ही प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर या दोघांना पकडण्यासाठी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार प्रसाद पाटील व पोलीस हवालदार रुपेश निगडे यांनी खबऱ्यांकडून माहिती घेऊन या दोघांना मंगळवारी अटक केली. त्यांना अलिबाग येथील न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.