। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील एकदंत सोसायटीमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने सासरे दुधाराम हरताजी घांची, यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपी विष्णू देसाई याला 22 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या सासूवरदेखील धारदार हत्याराने वार करून सासूलादेखील जखमी केलेले त्यांची तब्येत आता स्थिर आहे. रोहा बाजारपेठेतील व्यावसायिक दुधाराम घांची यांच्या मुलीचा विष्णू देसाई, रा. सेवादल आळी, रोहा हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. पण, विष्णू देसाई याची पत्नी लग्नाच्या वर्षभरानंतर त्याला सोडून गेली होती. आपल्या पत्नीला तिच्या माहेरच्या लोकांनीच गायब केल्याचा संशय विष्णू देसाई याला होता.
रोहा पोलिस स्टेशनचे पी.एस.आय शेगदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची पत्नी दोन वेळा घरातून निघून गेली होती. विष्णू देसाईने दोनवेळा बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती. दोन्ही वेळेला पोलिसांना तिला शोधण्यास यश आलं. आत्ता ती तिसर्यांदा बेपत्ता आहे पण कोणी बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली नाही. ही घटना घडल्यानंतर पोलिस तिचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांशी संपर्क करत आहेत.