| वावोशी-खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कारने निघालेल्या तरुणाचे प्राण पोलिसांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात वाचले आहेत. इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्येचा इशारा देत निघालेल्या या तरुणाला बोरघाट पोलिसांनी अमृतांजन पुल परिसरात कार अडवून ताब्यात घेतले. पोलिसांच्या वेगवान आणि तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळल्याने या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली पोलीस ठाण्याच्या डायल 112 वर शनिवारी (दि.15) पहाटे सुमारे 3.00 वाजण्याच्या सुमारास एक तातडीचा कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मित्राने क्रेटा कार घेऊन इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या करण्यासाठी निघाल्याची माहिती दिली. ही धक्कादायक माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तात्काळ बोरघाट पोलीस पथकाला सतर्क केले. त्यानंतर बोरघाट येथील डी.डी. पथकातील पोलीस शिपाई सचिन घोरपडे यांनी त्वरित ही माहिती बोरघाट व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केली. प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तरुण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्गावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. बोरघाट पोलीस मदत केंद्रातील पोलिसांनी जवळपास दीड तास महामार्गावर सतर्कपणे लक्ष ठेवून शोध सुरू ठेवला. अखेर अमृतांजन पुल परिसरात संबंधित क्रेटा कार दिसताच पोलिसांनी तात्काळ ती अडवली. वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय सुदाम दंडवते (23) रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे असे सांगितले. डायल 112 वरून मिळालेल्या माहितीनुसार तोच तरुण असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी आपुलकीने संवाद साधत त्याला शांत केले आणि आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांच्या आदेशानुसार बोरघाट पोलीस मदत केंद्राच्या शासकीय वाहनातून त्या तरुणाला खोपोली पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.







