पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
| पालघर | प्रतिनिधी |
पालघर शहरातील नाकोडा ज्वेलर्समध्ये घातलेल्या दरोड्यातील तब्बल 3 कोटी 72 लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. मात्र, पालघर पोलिसांनी केवळ 48 तासांत गुन्हेगारांना अटक केली आहे. गुजरातमार्गे नेपाळकडे पळ काढणाऱ्या आरोपींचा माग काढत भारत-नेपाळ सीमेवरून चार आरोपी, तर सुरतमधून आणखी एक आरोपी अशा एकूण पाच आरोपांनी अटक करण्याची धडाकेबाज कामगिरी पालघर पोलिसांनी केली. शिवाय त्यांच्याकडून तब्बल 3 कोटी 28 लाख 18 हजार 450 रुपये किंमतीचे सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
नाकोडा ज्वेलर्सचे पियुष जैन यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. त्यांचे नाकोडा ज्वेलर्सचे दुकान 8 नोव्हेंबर रोजी रात्री बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील दुकानाचे शटर तुटलेले दिसून आले. त्यानंतर तपास केला असता, सामाईक भिंतीत होल पाडून चोरांनी आत प्रवेश केला आणि गॅस कटरने तिजोरी कापून 5 किलो 420 ग्रॅम सोने, 40 किलो चांदी आणि 20 लाख रुपये चोरून नेल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि मॉलचे वॉचमन दीपक सिंग आणि नरेश हे गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासातून आरोपी नेपाळचे नागरिक असल्याचे समोर आले. ते गुजरातमार्गे नेपाळला पळून गेल्याचे उघड झाले.
त्यानंतर पोलिसांची पथके गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील खेरी येथे नेपाळ सीमेजवळ रवाना केली. तेथील सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने आरोपी दीपक नरबहादूर सिंग, भुचनसिंग चेलाऊने, जीवनकुमार थारु, खेमराज देवकोटा यांना सीमा तपासणीदरम्यान अटक करण्यात आली, तसेच सुरत येथून अर्जुन दामबहादूर सोनी याला ताब्यात घेण्यात आले. अशा एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून एकूण 3 कोटी 28 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.







