नवी मुबंई वाहतूक पोलिसांची 266 वाहनचालकांवर कारवाई
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडून मद्यपान करून वाहन चालवणार्या 266 वाहन चालकांची झिंग वाहतूक पोलिसांनी उतरवली आहे. तसेच 31 डिसेंबर रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात बंदोबस्तावेळी करण्यात आलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम न पाळणार्या 2 हजार 357 वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाच्या उपयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातो. हा जल्लोष साजरा करण्यासाठी अनेकजण मद्यपान करतात आणि वाहन चालवतात. मद्यपान करून वाहन चालवली जात असल्याने अनेक ठिकाणी अपघात होतात. ज्यात अनेकांना गंभीर दुखापत होते, तर कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागतो. याला आळा घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि अपघात कमी व्हावे, यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष पथके तैनात केली होती. मंगळवारी (दि.31) देखील नव वर्षाच्या स्वागतासाठी मद्यपानकरून वाहन चालवली जाण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक विभागाकडून महामार्ग तसेच शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली होती.
सायंकाळी आठ ते पहाटे पाच दरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान दुचाकी आणि चारचाकी अशा जवळपास 266 वाहन चालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. अशा वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, पोलीस उपआयुक्त, वाहतुक विभाग, सहायक पोलीस आयुक्त, वाहतुक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यापुढेही वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदारपणे वाहन चालविणार्या वाहन चालकांवर वेळोवेळी वाहतुक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे व वाहतुक सुरळीत ठेवण्यात नवी मुंबई वाहतुक विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकात केले आहे.