काताच्या अर्काचे 240 ड्रम्स भरलेला ट्रक पकडला
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून राजापूर ते गुजरात अशी खैरतोडीनंतर काताच्या अर्काचे 240 ड्रम्स भरलेल्या ट्रकसह खैरतस्करांना महामार्ग वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यात यश आले आहे. महामार्गावरील वनविभागाच्या वनउपज तपासणी नाक्यातील वनकर्मचार्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात यशस्वी झालेल्या खैरतस्करांना अटक करण्यात आली आहे. महाड आणि पोलादपूरदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हा ट्रक आणि चालक महाड एमआयडीसी पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. वनविभागाच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलादपूर शहराबाहेरील ग्रामीण रूग्णालयालगत पोलादपूर वनउपज तपासणी नाका असून, यावर्षाच्या प्रारंभीच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खैर झाडाच्या खोडातील गाभ्याची वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या अधिकार्यांनी पकडला होता. यानंतर कोकणाकडे दरवर्षी महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील खैराची वाहतूक करून सोलीव लाकडाची वाहतूक करण्यासाठी गावोगाव एजन्ट नेमल्यासारखे खैरतस्कर हे चोराटी निर्यातीचे काम करू लागले असताना अचानक महामार्गावरील खैराची वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत होते.
नातळाच्या सुट्टीनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परतीच्या प्रवासाची वाहनांची दाटी वाढली असताना पोलादपूरच्या अंडरपास हायवेमधून ग्रामीण रूग्णालयालगत वनउपज तपासणी नाक्यासमोरून निळ्या रंगाचे ड्रम्स भरलेला एक ट्रक लिलया बिनबोभाटपणे वनपाल बाजीराव पवार आणि सहकार्यांना कोणताही सुगावा न लागू देता गुरूवारी सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना होण्यात यशस्वी झाला.
यानंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी, भोर आणि सावित्री पुलाजवळ उभे राहून वाहनांची तपासणी करणारे पोलीस हवालदार तेजस कदम व पोलीस हवालदार नारायण शिर्के यांनी यांनी टाटा ट्रक अडविल्यानंतर एका ट्रकमध्ये 240 निळे ड्रम्स संशयास्पद वाटल्याने वनक्षेत्रपाल राकेश साहू यांना कळविले. यावेळी महाड एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जीवन माने आणि राकेश साहू यांनी 240 ड्रम्स खैरकाताच्या अर्कासह ट्रक आणि ट्रक चालकास ताब्यात घेतले. या अवैध वाहतूकप्रकरणी पोलीस आणि वनविभागामार्फत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. खैरतस्करांच्या या खैर काताच्या अर्काची वाहतूक करण्याच्या नव्या शक्कलीमुळे पोलादपूर व महाड येथील वनविभागाच्या डोळ्यात धूळफेक करून ट्रक राजापूर येथून गुजरातकडे रवाना होणार असल्याची माहिती प्राप्त झाली असली तरी या सर्व प्रकारात पोलीस आणि वनविभागाने समन्वयाने केलेल्या कारवाईचे यश पाहता यापूर्वी अनेक ट्रक्समधून ड्रमद्वारे खैर कात अर्काची वाहतूक करण्यात खैरतस्कर यशस्वी झाले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.