नवी मुंबई पालिकेकडून पाणी, विद्युतपुरवठा खंडित
| उरण | वार्ताहर |
कोपरखैरणे सेक्टर 7 येथील सम्राट सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब शनिवारी सायंकाळी कोसळला. यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी रविवारी सकाळी विद्युत आणि पाणीपुरवठा खंडित करून पालिका प्रशासनाने इमारत रिकामी करण्यास रहिवाशांना सांगितले.
प्लॉट नंबर 12 वर सम्राट सोसायटी या तीन मजली इमारतीचे बांधकाम 2000 मध्ये करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग तळमजल्यावरील घरात कोसळला. सुदैवाने ज्या ठिकाणी स्लॅब कोसळला, तेथे कोणीही नव्हते. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने रहिवाशांना तात्काळ इमारत खाली करावी, अशा सूचना दिल्या आहेत. इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही केली. रहिवाशांनी इमारत खाली करण्यासाठी मुदत मिळावी, असा अर्ज पालिकेस दिला आहे. पालिकेने वीज, पाणीपुरवठा खंडित केला आहे.
पावसाळ्यापूर्वीच नोटीस
इमारतीमध्ये 16 सदनिका असून, जवळपास 45 नागरिक वास्तव्य करीत आहेत. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच दिली होती.