वाहनचालक पद मंजूर नसल्याने धूळ खात उभे
| तळा | वार्ताहर |
तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल झालेले अग्निशमन वाहन शोभेची वस्तू बनली असून, या वाहनाला वाहनचालक पद मंजूर करण्यात आले नसल्याने गेल्या दहा महिन्यांपासून ते धूळखात पडले आहे.
तळा हा दुर्गम व डोंगराळ भागात वसलेला तालुका असल्याने या ठिकाणी बर्याचदा वणवे लागण्याचे प्रमाण अधिक असते. काहीवेळा आगीचे प्रमाण वाढल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी रोहा व माणगाव येथून अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करावे लागते. अंतर लांब असल्याने अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असते. त्यामुळे तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात स्वतंत्र अग्निशमन वाहन असावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार अग्निशमन सेवा बळकटीकरण योजनेंतर्गत जवळपास नव्वद लाख रुपयांचे अग्निशमन वाहन दहा महिन्यांपूर्वी तळा नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल झाले. मात्र, हे वाहन हाताळण्यासाठी वाहन चालक पद मंजूर करण्यात आले नसल्याने या वाहनाचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. सध्या सर्वत्र गवत सुकून मोठे झाले असल्याने नागरिकांकडून ते जाळले जात आहे. अशातच अनवधानाने आग पसरल्यास त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन वाहनाचा मोठा उपयोग होईल. परंतु, सद्यःस्थितीत हे वाहन हाताळण्यासाठी वाहनचालकच नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत या अग्निशमन वाहनाचा कोणताही उपयोग होणार नसल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.