ऑनलाइन शॉपिंग विरोधात धोरण

। चिपळूण । प्रतिनिधी ।

ऑनलाइन शॉपिंगमुळे चिपळूण बाजारपेठेचे 40 टक्के नुकसान झाले आहे. ऑनलाइन शॉपिंगचा बाजार असाच चालू राहिला तर पुढील दहा वर्षानंतर किरकोळ व्यापारी राहतील की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी गणेशोत्सवानंतर व्यापार्‍यांचा चिपळूण शहारात मेळावा होणार आहे. यात ऑनलाइन शॉपिंग विरोधातील धोरण ठरवले जाणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष शिरीष काटकर यांनी दिली आहे.

गणेशोत्सवानंतर होणार्‍या व्यापार्‍यांचा मेळाव्यात प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंगच्या विरोधातील धोरण ठरवले जाणार आहे. याबाबत माहिती देताना काटकर महणाले की, यावर्षी बाजारपेठेत गर्दी होती; परंतु बहुतांशी नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले आहे. यामुळे बाजारपेठेतील गर्दीचा व्यापार्‍यांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही. ऑनलाइन व्यापार करणार्‍या कंपन्यांमध्ये पूर्वी सरकारचा 51 टक्के आणि या कंपन्यांचा 49 टक्के हिस्सा होता. आता ऑनलाइन शॉपिंगमध्ये सरकारची भागीदारी पूर्णपणे संपली आहे. बँ्रडेड कंपन्या किरकोळ व्यापारांना चांगला नफा देण्यास तयार नाहीत. जीएसटी, इन्कम टॅक्स, कामगारांचा पगार, वीजबिल, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर आणि इतर किरकोळ खर्च स्थानिक व्यापारांना भागवाये लागत आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना कंपनी देईल ती वस्तू ग्राहकांना स्वीकारावी लागते. स्थानिक बाजारपेठेत खरेदी करताना मात्र ग्राहक आवडीनुसार वस्तू निवडतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ऑनलाइन शॉपिंगच्या विरोधात केंद्रात आवाज उठवला आहे. या पार्श्‍वभूमीवर आम्ही चिपळूममधील व्यापारी स्थानिक पातळीवर आवाज उठवणार असल्याचे काटकर यांनी सांगितले.

Exit mobile version