श्रीवर्धन तालुक्यात ‌‘राजकीय भूकंप’?

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरंग लागणार

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात येत्या 12 एप्रिल रोजी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात आता राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. केवळ उलथापालथी नसून, संपूर्ण सत्तासमीकरणे उद्ध्वस्त करणारा ‌‘राजकीय स्फोट’ ठरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक वर्षे अभेद्य मानला गेलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आता ढासळण्याच्या शेवटच्या टप्प्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काही ‌‘किंगमेकर’ नेते मोठा राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत असून, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर पक्षत्याग होण्याची शक्यता आहे. हा धक्का एवढा जबरदस्त असेल की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवरील पकड पूर्णपणे कोलमडू शकते, असे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उसळला असून, ‌‘आता सहनशक्ती संपली’, अशी उघड प्रतिक्रिया समोर येत आहे.

विकासकामांतील ढिसाळपणा, नेतृत्वातील गटबाजी आणि जनतेपासून वाढत चाललेली दुरावस्था या सर्वांचा एकत्रित उद्रेक 12 एप्रिलला होणार असल्याचे बोलले जात आहे. त्या दिवशी होणारा भव्य मेळावा हा केवळ कार्यक्रम नसून, सत्तेला थेट आव्हान देणारा शक्तिप्रदर्शनाचा महायज्ञ ठरणार आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक आणि नाराज नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोठमोठ्या घोषणा, थेट हल्ले, आणि राजकीय नकाशाच बदलून टाकणारे निर्णय या सर्वांची ‌‘काउंटडाउन’ सुरू झाली आहे.

विरोधकांनीही या परिस्थितीचा फायदा घेत श्रीवर्धनमध्ये सत्ता बदल अटळ आहे, असा आक्रमक सूर लावला आहे. काहींनी तर थेट दावा केला आहे की, 12 एप्रिलनंतर श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होईल. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर ही घडामोड अपेक्षेप्रमाणे घडली, तर हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकारणाला हादरा देईल.

Exit mobile version