एमआयडीसीच्या धरणाच्या उर्वरित जमिनींचा प्रस्ताव
| पोलादपूर | प्रतिनिधी |
2007 पासून पोलादपूर तालुक्यातील क्रीडा संकुलाचा विषय सातत्याने चर्चेत आहे. ही चर्चा क्रीडा क्षेत्रातून होत नसून, फक्त राजकीय क्षेत्रातूनच होत आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या राजकीय पक्षांनी या क्रीडा संकुलाच्या चर्चेचे गुर्हाळ आपापल्या परिने चालविले आहे. एमआयडीसीच्या रानबाजिरे धरणाच्या संपादित जमिनीपैकी वापरात न आलेल्या जमिनींचा प्रस्ताव या गुर्हाळातून नेहमीच पुढे आला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही पोलादपूर क्रीडा संकुलाचे पुन्हा राजकीय पक्षांकडून गुर्हाळ चर्चेत येण्याची शक्यता दिसून येत आहे.
पोलादपूर तालुका क्रीडा संकुलासाठी भूसंपादन करून शासनाचा तत्कालीन आर्थिक निधी प्राप्त करावा, असा विचार 2007 मध्ये आमसभेमध्ये तत्कालीन आ.स्व. माणिक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी मांडला. 2003 मध्ये शासन निर्णयामध्ये संरक्षक भिंत, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा व विद्युतीकरण या पायाभूत सुविधांचा समावेश नव्हता आणि 2009 मध्ये जरी तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकाम निधीमध्ये 1 कोटी रकमेची तरतूद झाली तरी पायाभूत सुविधांचा समावेश झाल्यानंतर ही रक्कमदेखील तुटपुंजी ठरू लागली. यावर विनामोबदला जमिनीचा उपाय शोधून अशी जमीन मिळविण्याचा सपाटा जमिनमाफियांना हाताशी घेऊन सुरू झाला. योजनेमध्ये 2009 मध्ये विस्तार करण्यात आला आणि विभागीय क्रीडा संकुलासाठी 24 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटी आणि तालुका क्रीडा संकुलासाठी 1 कोटी अशी आर्थिक तरतूद करण्यात आली. त्याकाळामध्ये 40 लाख रूपये आमदारनिधी होता आणि सत्ताधार्यांना दुप्पट आमदारनिधी असताना 1 कोटीचा निधी डोळे विस्फारायला लावणारा होता.
रायगड जिल्हा नियोजन समिती असो अथवा आमदारनिधी अथवा खासदारनिधी याबाबत स्थानिक नेत्यांच्या तालुका क्रीडा संकुलाच्या पाठपुराव्याच्या फुकाच्या वल्गना ऐकून गेल्या 20 वर्षातील शालेय खेळाडूंची प्रत्येक पिढी कपाळावर हात मारून घेत क्रीडा क्षेत्रापासून दूर होत नोकरी व शिक्षणाच्या वाटा चोखाळून तालुक्यापासून दुरावली. कोणत्याही जमिनीची निवड करण्यात आली नसताना स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांपासून आमदारांपर्यंत तसेच खासदारांच्या प्रचारसभांमध्येदेखील पोलादपूर तालुका क्रीडा संकुलाचा विषय उपस्थित करण्यात आला. पावसाळी क्रीडा स्पर्धा, प्राथमिक शाळांच्या बीट क्रीडा स्पर्धा, महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा तसेच विज्ञानप्रदर्शन आणि वार्षिक स्नेहसंमेलन असो, तालुका क्रीडा संकुलाचा विषय या स्थानिक नेत्यांनी नेहमीच ऐरणीवर मांडून स्वत:चा कपाळमोक्ष करून घेतला आहे. यामध्ये माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, आ.भरत गोगावले आणि अगदीच किरकोळ नेत्यांचा प्रयत्न केविलवाणा ठरला आहे.
दरम्यान, संपादित जमीन उक्त कारणासाठी संपादित करण्याची अधिसूचना निघाल्यानंतर 20 वर्षांत ज्या प्रयोजनासाठी जमिनी संपादित केली, त्या प्रयोजनासाठी वापर न झाल्यास मूळ शेतकर्याच्या नावे सातबारा पुन्हा तयार होत असल्याच्या जमीन अधिग्रहण भूसंपादन कायद्यांतील तरतुदींबाबत राजकीय अनभिज्ञता या घोषणांमुळे दिसून आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील क्रीडाप्रेमींसह खेळाडूंच्या हितासाठी झटणार्या ग्रामस्थांना क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता वाटत असताना राजकीय गुर्हाळाचा सर्वांनाच कंटाळा आला आहे. राज्य सरकारने थेट क्रीडा आणि युवक कल्याण विभागामार्फत क्रीडा संकुलासाठी प्रयत्न केल्यास पोलादपूर तालुक्याला हक्काचे क्रीडा संकुल मिळणार असल्याने आता शासकीय अधिकार्यांनीच यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे.