| नेरळ | प्रतिनिधी |
राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील सख्य आणखी ताणले जात आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षाकडून टोकाला जाणारी टीका होत आहे. त्यात रायगडचा वाल्मीक कराड, देशाचे स्वातंत्र्य, पैशाची देवाणघेवाण आदी सर्व बाहेर येत आहे. दरम्यान, आमदार थोरवे यांनी तुमच्या नेत्यांचा राजीनामा द्या, इकडे मी राजीनामा देतो असे खुले आव्हानं जाहीररित्या दिले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्याचे राजकारणात जोरदार चिखलफेक सुरू असून, महायुतीमधील हा वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांचे उट्टे काढण्यापर्यंत पोहचला आहे.
कर्जत मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी महाड येथे जाहिरसभेत रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती. त्यांनंतर रायगडच्या राजकारणात भरपूर चर्चा झाली आणि अगदी तिसऱ्याच दिवशी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर टीका करण्यात आली. त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आरोपांची तोफ डागताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते सुधाकर घारे यांनी थेट वाल्मीक कराड अशी पदवी बहाल केली. त्याचवेळी महेंद्र थोरवे यांना आव्हानं देणारी भाषणे पत्रकार परिषदेत झाली. आमदार महेंद्र थोरवे हे गप्प बसतील हे शक्य नव्हते. त्यासाठी सहा जून रोजी कर्जत विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिवसेना पक्षाने आयोजित केली. निमित्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे असलेतरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या भाषणात यांच्या निशाण्यावर सुधाकर घारे, भरत भगत आणि सुनील तटकरे हेच राहणार होते.
शिवसैनिकांचे बैठकीत आमदार थोरवे यांनी यापुढील सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत असे सांगितले आणि नंतर दहा मिनिटांचे भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांची राळ उठवली. सुधाकर घारे यांच्यावर आपले भरपूर उपकार आहेत हे त्यांच्या वडिलांना विचारा पण तुम्ही माझ्यावर आरोप करताना परिसीमा बाळगली नसल्याने पराभव झाल्यावर तो पचवायचा असतो. आम्ही देखील पराभव पचवला असून पराभव का झाला यांचे आत्मचिंतन करा अशी सूचना केली. मात्र त्यानंतर सुनील तटकरे यांच्याकडे मोर्चा वळविताना आमची मदत घेऊन सुनील तटकरे तुम्ही खासदार झाला आहात. तुम्हाला तुमच्या राजकीय ताकदीची एवढी खात्री आहे तर राजीनामा द्या मी देखील लगेच राजीनामा देतो. तुम्ही पुन्हा खासदार होऊन दाखवा असे आव्हान देताना मला माझ्या शिवसैनिकांवर विश्वास असल्याने कर्जतमधून पुन्हा निवडून येईन असा हल्ला चढवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत भगत यांच्यावर एकेरी भाषेत हल्ला चढवताना आमदार थोरवे यांनी याला वाटते त्याच्यामुळे देश स्वतंत्र झाला अशी टीका असताना तू आधी माझ्याकडून घेतलेले पैसे परत दे नंतर बघू असे आव्हान दिले. मी फार वाईट असून मला तोंड उघडायला लावू नका असे आव्हान आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केले. शिवसेना विरुद्ध शिवसेना लढते त्यावेळी विरोधकांचा फायदा होतो, पण यावेळी महायुतीच्या घटक पक्षात अपक्ष बरोबर लढाई होती. या निवडणुकीत शिवसेना एकसंघ असती तर मला दीड लाख मते मिळाली असती आणि त्यामुळे शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असे जाहीर केले.
हे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण आणि चिखलफेक सुरू असताना लागलीच सात जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस भरत भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली. भगत यांनी देखील नेहमीप्रमाणे महेंद्र थोरवे यांच्यावर एकेरी भाषेत हल्ला चढवला. तुझे मी पैसे कधीच घेतले नाहीत तर मी अडचणीत असताना माझ्या मुलाकडून अकरा लाख उकळले असा आरोप केला. तुमचे पैसे मी घेतले असतील तर कर्जत टिळक चौकात स्टेज बांधा मी सर्व बँक डिटेल्स घेऊन येतो तेथेच जनतेच्या समोर कोणी कोणाचे पैसे घेतले हे जाहीर करू असे आव्हानं भरत भगत यांनी आमदारांना दिले. त्याचवेळी आपण स्वातंत्र्य सैनिक यांचे सुपुत्र असून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका घेतली होती. याचा आपल्याला अभिमान आहे. माझ्या वडिलांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी लढा उभारला तर तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचे काम करीत आहात. देश स्वतंत्र झाला त्यावेळी माझा जन्म पण नव्हता आणि त्यामुळे देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात माझा तसा काही संबंध नाही असे सांगताना आता हे दोन्ही शिवसेना एकसंघ करणार म्हणत आहेत, ते त्यांचे नेत्यांना पचणार आहे काय? असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे. जे जाणार होते ते तुमच्या बरोबर गेले आहेत राहिले आहेत ते ठामपणे शिवसेना ठाकरे पक्ष ताकद बाळगून आहेत आणि त्यामुळे शिवसेना एकसंघ ठेवण्याचे विसरून जा, असा सल्ला भगत यांनी दिला. या राजकीय चिखलफेकीमुळे कर्जत तालुक्याचे राजकारण खालच्या थराला गेले असल्याची चर्चा कर्जत तालुक्यात ऐकावयास मिळत आहे.