कवठेमहांकाळ येथे शेकापचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा संपन्न
| विटा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राज्यभर विभागवार मेळावे घेण्यात येत आहेत. पहिला पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा कवठेमहांकाळ येथे घेण्यात आला. राज्यभरात शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढणार आहे, शेतकरी कामगार पक्ष हा एक विचार असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पिढ्यानपिढ्या जपला आहे.त्यामुळे हा विचार कधीच संपणार नाही. शक्तीपीठ महामार्ग हा सर्व सामान्य शेतकरी कष्टकरी, कामगार यांना उद्ध्वस्त करणारा आहे. यामुळे शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायला हवे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेकापतर्फे लढा उभारणार आहोत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी केले. कवठेमहांकाळ येथे शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार बाळाराम पाटील , माजी आमदार संपत बापू पवार – पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, एस.व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गेली दोन वर्ष संघर्ष सुरू आहे. गायरान रहिवाशी अतिक्रमणे कायम झाली पाहिजेत, शेतीमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमुक्ती या व इतर विषयावर लढा मजबूत करण्याची गरज असल्याचे दिगंबर कांबळे यांनी सांगितले.
संघटन बांधणी तसेच येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज झाले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पक्ष वाढीसाठी गावागावांतील कष्टकऱ्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नासाठी संघर्ष उभा करून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या जमिनी दडपशाहीने काढून घेण्याच्या निर्णयाचा निषेध करायला पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, असे शेतकरी सभेचे अध्यक्ष एस. व्ही.जाधव म्हणाले.ॲड मानसी म्हात्रे यांनी महिलांच्या प्रश्नासाठी संघर्ष उभा करण्याचे आवाहन केले.अजितराव सुर्यवंशी, पोपटराव बोराडे, समीर देसाई, बाबासाहेब देवकर, शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार संपत बापू पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा हा कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा आहे. प्रा. बाबुराव लगारे यांनी आभार मानले. विनोद लगारे यांनी सूत्रसंचालन केले. साथी ललित बाबर यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेकाप कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे, दादा बाबर, ॲड. सुभाष पाटील, बाबुराव जाधव, सूर्यकांत पाटील, संपतराव पवार, देवकुमार दुपटे, संजय निकम, इंद्रजीत पवार , किशोर बनसोडे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.