| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. महेंद्र थोरवे यांनी 2900 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. मात्र, ती कामे दिसत नसल्याने शासनाने त्या सर्व कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करावे, अशी मागणी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी सरकारकडे केली. तर, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवे यांच्याकडून जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामधील कोणतेही काम झाले नाही, असा आरोप करीत व्हिडीओ लावून त्या सर्व विकासकामांची पोलखोल घारे यांनी केली.
सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्जत आणि खालापूर तालुक्यातील विकासकामांच्या प्रश्नावर माहिती दिली. विद्यमान आमदारांनी मतदारसंघात मोठे विकासकामे केली आहेत आणि त्यात अनेक मोठ्या कामांची नावे घेतली होती. याची पोलखोल करताना राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासमोर भाषण करताना आमदार थोरवे यांनी 800 कोटींचा निधी आणला. त्यानंतर मागील काही दिवस आधी जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी दोन हजार कोटींचा उल्लेख केला. प्रशासकीय इमारत निधी, श्रीराम पूल ही कामे 2019 मध्ये नोव्हेंबरमध्ये आमदार नसताना ती कामे मंजूर झाली होती. कोंढाणे धरणाचे काम 2017 रोजी मंजूर झाले आहे, भूसंपादनदेखील त्यावेळी झाले होते. मात्र, त्यांच्या अहवालात 1400 कोटी मंजूर झाले आहे, तर त्यांचे काही योगदान नाही. असे असताना आ. थोरवे यांनी 2900 कोटींचा निधी आणला आहे असे जाहीर केले आहे. हा निधी आणला असेल तर तो निधी गेला कुठे, हे शोधावे लागले असे आवाहन सुधाकर घारे यांनी केले. त्यांनी आणलेला तो निधी त्यांच्या घरी गेला की त्यांच्या घराच्या सुशोभिकरणासाठी गेला हेदेखील शोधावे लागणार, असा निर्धार सुधाकर घारे यांनी व्यक्त केला. 2019 मध्ये दिलेल्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेली कामे कुठेही झाली नाहीत, असा आरोप सुधाकर घारे यांनी केला.
कर्जत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांच्यासह भरत भगत, अशोक भोपतराव, भगवान भोईर, अंकित साखरे, मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस विलास थोरवे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव, मनसेचे जिल्हा नेते प्रवीण गांगल, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.