घरातील प्रदूषित पाणी अंबा नदीत

| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सरळ अंबा नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे हेच पाणी पिणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाली शहरात पाहायला मिळत आहे. कोणताही पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प अस्तित्वात नसल्याने प्रदूषित पाणी सोडणारे कोण? हे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पाली शहरातील नागरिकांना अंबा नदीच्या पात्रातूनच पाणी पिण्यासाठी व इतर कामांसाठी उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रदूषित पाण्याचा आपल्या भावी पिढीवर काय परिणाम होईल? या चिंतेत पालीकर आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. प्रशासनाने प्रदूषित पाण्यापासून आमची सुटका करावी, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. नवनिर्वाचित प्रतिनिधींनी यावर लवकरच तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करत आहे. तसे न झाल्यास ‘नदी उशाशी आणि कोरड घशाशी’ असे म्हणण्याची वेळ पालीकरांवर येणार हे मात्र निश्‍चित.

पाली शहराला शुद्ध जलपुरवठा करण्याकरिता नवीन योजनेचा प्रस्तावबाबतचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात पालीकरांचा शुद्ध पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

अरिफ मनियार, उपनगराध्यक्ष पाली
Exit mobile version