गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची मात्र टाळाटाळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जेएसडब्ल्यू कंपनीच्या वायू प्रदूषणानंतर सुरु झालेल्या ध्वनी प्रदूषणाविरोधात शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार रायगड पोलिसांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेत जेएसडब्ल्यूच्या प्रदूषणाविरोधात हरित लवादाने पाच सदस्यीय संयुक्त समितीमार्फत चौकशी सुरु असून, त्रुटींच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, अजूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याबाबत पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंडित पाटील यांच्या तक्रारीबाबत लेखी पत्र दिले आहे. त्यानुसार अपर जिल्हादंडाधिकारी, अलिबाग-रायगड यांचे आपल्या सहपत्रासह दि. 28 जानेवारी 2022 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त झाले. या पत्रामध्ये कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित वायू व धूळ सोडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने या कार्यालयास यापूर्वी काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने या कार्यालयामार्फत जेएसडब्ल्यू कंपनीची 29 जानेवारी 2022 रोजी पाहणी केली. या पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने या कारखान्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हरित लवादाकडे समिता राजेंद्र पाटील विरुद्ध जेएसडब्ल्यू व इतर यांची याचिका दाखल असून, या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाने (27 मे 2021) दिलेल्या आदेशान्वये सचिव, पर्यावरण, वन आणि जलवायू परिर्वतन मंत्रालय, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई, जिल्हा दंडाधिकारी, रायगड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सदस्य आहेत. ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आपल्या तक्रारीची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतल्याबाबत पंडित पाटील यांनी समाधान व्यक्त करतानाच वडखळ पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवर अद्यापही रायगड पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आतातरी पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवित जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.