गाढी नदी प्रदूषणमुक्ती फक्त कागदावरच

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल परिसरातील गाढी नदी गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली असतानाही प्रशासनाकडून केवळ घोषणाबाजीच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठ्या गाजावाजात नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता, मात्र त्यानंतर प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना झालेली दिसून येत नाही.

दरम्यान, अनेक अधिकारी बदलले, विविध योजना जाहीर झाल्या, परंतु गाढी नदीची स्थिती ‌‘जैसे थे’च आहे. ऋतू बदलले, परिस्थिती बदलली, पण नदीतील घाण, दुर्गंधी आणि साचलेला कचरा कायमच आहे. नदीकाठच्या नागरिकांना अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “नदी स्वच्छतेचे उपक्रम केवळ दिखावा ठरले का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “माझ्यासाठी कुणाकडे वेळ नाही का?” अशी जणू हाकच गाढी नदी प्रशासनाला देत आहे. आता तरी संबंधित यंत्रणांनी जागे होऊन केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करावी आणि गाढी नदीला खऱ्या अर्थाने प्रदूषणमुक्त करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version