यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांची भूमिका संशयास्पद
। पनवेल । दीपक घरत ।
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने पनवेल पालिका हद्दीत दोन ठिकाणी हवेतील प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेली ही यंत्रणा अद्यापही अंडर टेस्टिंगमध्ये असल्याने ही यंत्रणा बसवून एमपीसीबी अधिकार्यांनी काय साध्य केले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पनवेल पालिका हद्दीत हवेतून होणार्या प्रदूषणाच्या मुद्याने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. हवेतून होणारे हे प्रदूषण रोखणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले असून, हवेतून होणार्या प्रदूषणामुळे पालिका हद्दीतील रहिवाशांना विविध व्याधीचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणाच्या या त्रासातून नागरिकांची सुटका व्हावी, याकरता पालिका हद्दीतील काही सामाजिक संस्था तसेच राजकीय पुढार्यांकडून पाठपुरावा केला जात असल्याने एमपीसीबीच्या माध्यमातून कळंबोली वसाहत व तळोजा औद्योगिक वसाहतीत जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून हवेतील प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा (कॉन्टिनुएस एंबिएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन) बसवण्यात आली आहे.
मात्र वर्षभरापूर्वी बसवण्यात आलेली ही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकार्यांच्या कामाची पोलखोल होण्याच्या भीतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याचा आरोप खारघर तळोजा कॉलनी वेलफेयर असोशियनचे अध्यक्ष मंगेश रानवडे यांनी केला आहे.
कॉन्टिनुएस एंबिएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन
एमपीसीबीतर्फे ही यंत्रणा कळंबोली वसाहतीमध्ये सेक्टर 2 ई येथील उद्यान तसेच तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हिंदालको कंपनी परिसरात बसवण्यात आली आहे. कॉन्टिनुएस एंबिएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनसाठी प्रत्येकी 45 ते 60 लाख रूपये खर्च करण्यात आहेत. या यंत्रणेमुळे हवेमध्ये कोणकोणते प्रदूषणकारी घटक आहेत आणि त्याचे प्रमाण किती आहे, याची माहिती मिळते. तसेच हे घटक कुठल्या भागातील कारखान्यातून सोडण्यात येतात, याचा माग घेणे यामुळे शक्य होते.
लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली यंत्रणा अविश्वसनीय असून, नागरिकांची दिशाभूल करणारी आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून केलेली मोजमाप व सामाजिक संस्थांकडून करण्यात येणार्या मोजमापात तफावत आढळून येत असल्याने पोलखोल होण्याच्या भीतीने यंत्रणा सुरु करण्यात चालढकल करण्यात येत आहे.
मंगेश रानवडे. अध्यक्ष.खारघर तळोजा कॉलनी वेलफेयर असोशियन
एमपीसीबीमार्फत बसवण्यात आलेल्या यंत्रणेवर केल्या जाणार्या मोजमापाची नोंद नक्की कुठे करण्यात येते आणि या यंत्रणेद्वारे नोंदवण्यात येणार्या प्रदूषणाची दखल घेत एमपीसीबीद्वारे काय कारवाई करण्यात येते, याबाबतची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
सुनील भोईर. अध्यक्ष. तळोजा कॉग्रेस पर्यावरण विभाग.