तलावातील जलपर्णींमुळे उल्हास नदीचे प्रदूषण

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत-कल्याण रस्त्यावर असलेल्या नेरळ ग्रामपंचायतचे मालकीचे असलेल्या ब्रिटिशकालीन धरणाच्या पाण्यावर जलपर्णीचे पांघरून घातल्याचे चित्र दिसून येत आहे. या जलपर्णीमुळे तलावातील पाणी दूषित झाले असून नेरळ ग्रामपंचायतीने तलावातील जलपर्णी काढण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत.

नेरळ ग्रामपंचायतीकडून गेली दोन वर्षे तलावातील गाळ माती काढणायची कार्यवाही होत आहे. मात्र, मुबलक पाणी असल्याने एप्रिलमध्ये चांगला पाणीसाठा तेथे असतो. यावर्षी या पाण्यावर जलपर्णींनी मुक्काम केला आहे. त्याचवेळी जलपर्णी वाढल्याने पाण्यात अंघोळी करण्यासाठी येणार्‍या जनावरांचे हाल झाले आहेत. त्यांना जलपर्णीच्या थरामुळे धरणातील पाणी देखील जनावरांना पिता येत नाही. या तलावातील पाण्यावर निर्माण झालेल्या जलपर्णी पावसाळ्याआधी काढण्यात आल्या नाहीत तर या जलपर्णी पावसाच्या पाण्यासोबत उल्हास नदी वाहत जाऊन उल्हासनदीचे प्रदूषण वाढवित असतात.

पंरंतु, या तलावामधील जलपर्णी बाजूला काढण्याऐवजी कोणीतरी तलावातील पाणी थेट नदीत सोडून दिले. हे पाणी जलपर्णीसह उल्हास नदीत सोडण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत.ठाणे जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणार्‍या उल्हास नदीचे पाणी प्रदूषित करण्यात नेरळ ग्रामपंचायतीचे ब्रिटिश कालीन तलाव कारणीभूत ठरले आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडे या बाबत विचारणा केली असता कोणी धरणातील पाणी सोडले याची माहिती नसल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र, धरणातील पाणी सोडल्याने कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी प्रदूषित होण्यास कारणीभूत ठरली आहे.

Exit mobile version