पॉन्टिंगचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयसीसी टी-20 विश्‍वचषक 2024 चा थरार (दि.2) जूनपासून रंगणार आहे. आणि विश्‍वचषक संपल्यानंतर भारतीय संघाचे विद्यमान मुख्य कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय आधीच भारतीय संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात व्यस्त आहे. मुख्य प्रशिक्षक होण्याच्या या शर्यतीत अनेक खेळाडूंचा सहभाग आहे. पण, एकापाठोपाठ एक दिग्गज ही जबाबदारी सांभाळण्यास नकार देत आहेत. राहुल द्रविडने आधीच कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. आरसीबीच्या पराभवानंतर बंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनीही यासाठी नकार दिला. आता आणखी एका माजी दिग्गज खेळाडूने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे.

भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण असेल, हा मोठा प्रश्‍न आहे. दररोज अनेक दिग्गजांची नावे पुढे येत आहेत, जे या पदासाठी शर्यतीत आहेत. या मालिकेत आणखी एका दिग्गज खेळाडूने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे. हा दिग्गज खेळाडू दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा विश्‍वविजेत्या खेळाडू रिकी पाँटिंग आहे. आयपीएल दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने हे रहस्य उघड केले आहे. पॉन्टिंगला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र पाँटिंगने कारण सांगून ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

पॉन्टिंग म्हणाला की, आयपीएलदरम्यान मला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. माझ्या मुलाची इच्छा आहे की मी ही ऑफर स्वीकारावी, पण मी तसे करणार नाही, कारण ते माझ्या लाइफस्टाइलमध्ये बसत नाही. यासोबत मला माझ्या कुटुंबाला वेळ देता येणार नाही. जर मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झालो तर मी आयपीएल फ्रँचायझीसोबत काम करू शकणार नाही. आणी मी सध्या इतका वेळ देऊ शकत नाही, ही वेळ माझ्या आयुष्यात शोभणारी नाही. मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, म्हणूनच मी मुख्य प्रशिक्षक बनू शकत नाही.

Exit mobile version