पूनम पांडे जिवंत! ‘या’ कारणासाठी केला स्वतःच्या मृत्यूचा बनाव

। मुंबई । प्रतिनिधी ।

पूनम पांडेने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. शुक्रवारी (दि.२) पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त समोर आले आणि अवघे बॉलिवूड हळहळले. मात्र, आज समोर आलेले वृत्त धक्कादायक आहे. पूनम पांडेने स्वत: तिचा व्हिडिओ शेअर केला असून, ती निरोगी आणि तंदुरुस्त आहे. अभिनेत्रीने स्वत:च तिचे निधन झाल्याची बातमी पसरवली होती. सर्व्हायकल कॅन्सर या आजाराविषयी जागरुकता पसरवण्यासाठी पूनमने अशाप्रकारचा स्टंट केला होता. तिने स्वत: व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली.

मृत्यूची बातमी शेअर केल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. जो पहिला व्हिडिओ शेअर केला आहे त्यात असे म्हटले की, ‘मी जिवंत आहे, सर्व्हायकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झालेला नाही. मात्र, दुर्दैवाने ही गोष्ट मी त्या शेकडो-हजारो महिलांबद्दल बोलू शकत नाही, ज्यांचा सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू यामुळे झालेला नाही की त्या काही करू शकल्या नाहीत, पण यामुळे की त्यांना माहीतच नाही की काय करायला हवे. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे की, सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंध करण्यायोग्य आहे. तुम्हाला केवळ तुमच्या चाचण्या करुन घ्यावा लागतील, HPV लस घ्यावी लागेल. या आजारामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये याकरता या सर्व गोष्टी आणि इतरही काही गोष्टी आपण करू शकतो’.

दुसऱ्या व्हिडिओत तिच्या जाण्याने दु:ख करणाऱ्यांची माफी मागितली आहे. ती म्हणते की, ‘मी ज्यांना दुखावले त्यांची माफी मागते. माझा हेतू? सर्वांना धक्का बसल्यानंतर ज्याबद्दल हवे तेवढे बोलले जात नाही, त्या सर्व्हायकल कॅन्सरबद्दल बोलणे हाच माझा हेतू होता. हो मी माझ्या मृत्यूचा बनाव केला. हे खूप जास्त आहे, मला माहितेय… पण यानंतर अचानक आपण सर्व्हायकल कॅन्सरबद्दल बोलतो आहोत. हा असा आजार आहे जो शांतपणे तुमचा जीव घेतो. या आजारकडे तातडीने लक्ष वेधणे गरजेचे होते. माझ्या मृत्यूच्या बातमीमुळे जे काही साध्य करता आले आहे, याचा मला अभिमान आहे.’

अशाप्रकारे स्वत:चाच सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची बातमी पसरवावी लागल्याने अभिनेत्रीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Exit mobile version