गावे 72 तास अंधारात; नागरिक संतप्त
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
तालुक्यामध्ये महावितरणने सावळागोंधळ घातला असून, अनेक गावांमध्ये 72 तास उलटूनही विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. जालगांव येथील नागरिकांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन अधिकार्यांना धारेवर धरले होते. त्यामुळे जालगांवच्या श्रीरामनगर व बौद्धवाडी या परिसरात शुक्रवारी (दि.26) दुपारी तीनच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.
दापोलीतील अनेक गावांमध्ये महावितरणचा सावळागोंधळ सुरू असून मौजे दापोली येथे 68 तास विद्युत पुरवठा खंडित आहे. असाच प्रकार मौजे दापोली ते ताडील, कळंबट या भागातही आहे. साखळोली, खेर्डी, पालवणी, दाभोळ, बुरोंडी, पंचनदी, चंद्रनगर, बोंडीवली, जालगांव, पांगारवाडी, लष्करवाडी, श्रीरामनगर, आगरवायंगणी, आघारी, केळील, सातेरेतर्फे नातू, हर्णे येथेही 24 जुलैला खंडित झालेला विद्युत पुरवठा 26 जुलैला रात्रीपर्यंत सुरळीत झालेला नव्हाता. वीज नसल्याने याचा प्रत्येक गावातील नळपाणी योजनेवर परिणाम झाला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका एसटीलाही बसला आहे. बसमध्ये डिझेल भरण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित असल्याने अडचणी येत आहेत. तसेच, ऑनलाईन आरक्षण व अन्य संगणकीय कामेही ठप्प झाली आहेत.
उद्योगांना फटका
महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनने वीज पुरवठा सुरळीत नसल्याबाबत केवळ स्थिर आकार भरला जाईल, असा इशारा देत मासिक वीजबिले भरण्यास असमर्थता दर्शवली आहे. अनेक उद्योगांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही त्यामुळे कर्मचार्यांचे पगार अंगावर पडत असून, वेळेत माल तयार होत नसल्याने पुढील ऑर्डर रद्द होत आहेत. त्याचा फटका उद्योगांना बसत आहे.
पर्यटकांची पाठ
तालुक्यामध्ये पावसाळी पर्यटनासाठी अनेक पर्यटक येत आहेत. कर्दे, मुरूड, पाळंदे, सालदुरे या भागामध्ये अनेक पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत; परंतु या गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे.