| अलिबाग | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदार याद्या अद्ययावत केल्याचा गाजावाजा केला. परंतु अलिबाग तालुक्यातील कुसूंबळे पंचायत समिती गणात मतदार यांद्याच्या भोंगळ कारभाराबाबत शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील आक्रमक झाले. ही यादी तात्काळ अद्ययावत करावी, अशी मागणी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांच्याकडे केली. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा दिला.
यावेळी अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, स्वानंद कोठेकर, बाळकृष्ण पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मतदार याद्यांचे पुर्नरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात करण्यात आला. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील कुसूंबळे, काचळी, आणि वाघविरा या गावांमध्ये 34 मतदार असलेल्या नागरिकांची नावे अलिबाग विधानसभा मतदार यादीतून रद्द करण्यात आली. रद्द केलेल्या मतदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही. याच गावातील नागरिक कायमचे रहिवासी असतानादेखील त्यांची नावे मनमानी कारभार करून काढण्यात आल्याची बाब पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर यांनी माजी आ. पंडित पाटील यांच्या लक्षात आणून दिली.
त्यामुळे पंडित पाटील यांनी नुकतीच अलिबाग तहसीलदार यांच्यासह निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांची भेट घेतली. एकतर्फी नावे रद्द केल्याने मतदार मतदानाच्या मुलभूत हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या या कारभाराबाबत पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत याबाबत संबंधितांविरोधात कारवाई करा आणि तात्काळ मतदार यादी अद्ययावत करा अशी मागणी केली. यावेळी स्नेहा उबाळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उबाळे यांनी यावेळी दिले.