तळा बसस्थानकाची दुरवस्था

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांबरोबर तळा बसस्थानकाचे देखील कायापालट करून त्याला विकासाच्या प्रवाहात आणावे अशी मागणी तळावासीयांकडून करण्यात येत आहे. तळा तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण असलेले तळा बसस्थानक अनेक सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे समस्यांचे माहेरघर बनले आहे. तळा तालुक्यात एसटी हे दळणवळणाचे एकमेव साधन असून दिवसभरात जवळपास 80 ते 85 एसटीच्या फेर्‍या सुरू असतात. त्यामुळे तळा बसस्थानकात प्रवाशांची नेहमी वर्दळ असते, मात्र स्थानकात अनेक सोयीसुविधांची कमतरता असल्याने बसस्थानकाची दुरवस्था झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

2011 साली 8 लाख रूपये खर्च करून पत्रा शेड बांधून तळा येथे बसस्थानक उभारण्यात आले. मात्र स्थानकातील आवारात अद्यापही काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत असून येणार्‍या जाणार्‍या तसेच बसस्थानकात बसलेल्या प्रवाशांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक तयार झाल्यापासून आजपर्यंत बसस्थानकात पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे येथील प्रवाशांना पिण्यासाठी विकतचे पाणी आणावे लागत आहे.

बसस्थानकासमोरील डाव्या बाजूला असलेला भाग ऊंच व खडकाळ असल्यामुळे चालकाला स्थानकात एसटी लावण्यास अडचण निर्माण होते. तसेच त्याठिकाणी एसटी फिरवून घेणे कठीण जात असल्यामुळे चालक बाहेरच्या बाजूस एसटी लावणे पसंत करतात. परिणामी बाहेर मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवते अशा एक ना अनेक समस्या असूनही एसटी महामंडळाच्या अधिकारी वर्गाचे मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Exit mobile version