खारघरमध्ये ई-टॉयलेटची दुरवस्था; नागरिकांमध्ये नाराजी

| पनवेल | वार्ताहर |

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेने हजारो रुपये खर्च करून खारघरमधील उद्यानात उभारलेले ई-टॉयलेटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेले टॉयलेट केवळ देखावे म्हणून ठरत आहे. पनवेल महानगरपालिका अस्तिवात आल्यानंतर खारघर वसाहत पालिकेकडे हस्तांतरण झाले. उद्यानात येणार्‍या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पनवेल महापालिकेकडून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून काही ठिकाणी ई- टॉयलेट उभारले.

हे टॉयलेट उभारून सध्या तीन वर्षे झाले आहे. ई- टॉयलेटची सुविधा उपलब्ध केल्यामुळे सुरुवातीला नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पालिकेचे कौतुक केले; मात्र उद्यानात उभे केलेल ई- टॉयलेट तीन वर्षात केवळ तीन महिनेच सुरू होते. तीन महिन्यानंतर वीज, पाणी उपलब्ध न झाल्याने ते बंद करण्यात आले. ते आजतागायत बंद असल्याने उद्यानात येणार्‍या नागरिकांची त्यामुळे गैरसोय होत आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना अशा टॉयलेटची गरज जास्त असते. मात्र हे टॉयलेट बंद असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधीनी अनेक वेळा पालिका अधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार तसेच भेट घेऊन टॉयलेट सुरू करण्याची मागणी केली. मात्र अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेले ई- टॉयलेट केवळ देखावा आणि शोभेची वस्तू झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Exit mobile version