कोसळणार्या छतामुळे ग्राहकांच्या जीवाला धोका
| उरण । वार्ताहर ।
शहरातील नगरपरिषदेच्या मासळी बाजाराची दुरावस्था झाली आहे. बाजाराचे छत कोसळ्याच्या स्थितीत असल्यामुळे मच्छिमार व्यापार्यांच्या तसेच मासळी खरेदीसाठी येणार्या ग्राहकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
शहरातील कोटनाका येथील नगरपरिषदेच्या मासळी बाजाराच्या छताचे प्लास्टर गळू लागले आहे. तसेच बाजारातील फरश्या उखडल्या आहेत. आणि धोकादायक म्हणजे बाजाराच्या इमारतीला वीज पुरवठा करणार्या विजेच्या बोर्डाच्या तारा लोंबकळू लागल्या आहेत. त्यामुळे विजेचा धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बाजारात मासळी विक्रीसाठी बसणार्या महिलांना स्वछतागृह उपलब्ध नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तसेच बाजराच्या समोरील आवारात सकाळी 6 ते 8 वाजताच्या दरम्यान घाऊक मासळी विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र कालावधी नंतरही त्यांची मासळी विक्री सुरू रहात असल्याने बाजारातील मासळी विक्रीवर परिणाम होत असल्याचे येथील मासळी विक्रेत्यांची तक्रार आहे.
या संदर्भात उरण कोळीवाडा येथील बापूजीदेव मच्छिमार संस्थेने उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना निवेदन दिले आहे. यामध्ये नगरपरिषदेने मदत करण्याचे आवाहन केले आहे.