निजामपूरच्या आरोग्य केंद्राची दुरवस्था

पंकज तांबेंनी मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष
। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव-पुणे मार्गावरील महत्वाचे निजामपूर येथे 60 वर्षापूर्वी त्या भागातील नागरिकांना प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. या आरोग्य केंद्रात प्रस्तुती गृह, शस्त्रक्रिया गृह नादुरुस्त आहे. तसेच स्त्री रुग्ण कक्ष, बैठक सभागृहाचे छप्पर दोन वर्षांपूर्वी उडाले असून ते नादुरुस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे पावसाळ्यात हाल होत आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे निवासस्थान गळत आहेत. तर काही निवासस्थान मोडकळीस आले आहेत. या झालेल्या दुरवस्थेबद्दल बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देवून लक्ष वेधले आहे.

या आरोग्य केंद्रावरील पत्रे सन 2020 मध्ये निसर्गचक्री वादळात उडून नुकसान झाले असून ते अद्यापही दुरुस्ती केले नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजिपचे अलिबाग येथून बांधकाम अभियंता येऊन पाहणी करून दीड वर्ष लोटली मात्र अद्यापही याची दुरुस्ती झाली नाही. निजामपूरला जोडणारी अनेक गावे दुर्गम असून या आरोग्य केंद्रात वेशेषताः पावसाळ्यात विंचू, सर्पदंश झालेले रुग्ण रात्री अपरात्री उपचारासाठी येतात. तसेच प्रसूतीसाठीही स्त्रिया दाखल होतात. त्याचबरोबर माणगाव-पुणे राज्यमार्गावरील उपघाताचे वाढते प्रमाण पाहता याठिकाणी उपचारासाठी रुग्ण येतात. रुणालयातच सुविधा नसल्याने उपचारात अनेक अडचणी येत आहेत. या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक हे पद 1 वर्षांपासून तर उपकेंद्रातील आरोग्य सेविकांची 3 पदे 8 वर्षापासून तसेच 2 शिपाई पदे 2 वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्राचे आरोग्यच बिघडल्याने यावर उपचार कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित करीत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तसेच दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती असून आरोग्य केंद्रालगत एक वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी फक्त एक निवास आहे. ते हि गळत आहे. त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच कर्मचार्‍यांची दोन निवासस्थान नादुरुस्त आहेत. फर्निचर मोडकळीस आले आहे. तर एक संगणक असून तेही नादुरुस्त असते. याठिकाणी राहणारे कर्मचारी पावसाळ्यात आपला जीव मुठीत धरून राहतात. काही कर्मचार्‍यांनी स्वखर्चाने निवासाची डागडुजी केली आहे.

Exit mobile version