| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमध्ये महानगरपालिकेतर्फे माठ्या प्रमाणात विकासकामे होताना दिसत आहेत. काही ठिकाणी कामे चालु आहेत, तर काही ठिकाणची कामे पुर्ण होऊन उद्घाटनही झाली आहेत. परंतु, उद्घाटन झाल्या नंतर आपली जबाबदारी संपली, अशी मनस्थिती सध्या पालिकेची दिसत आहे. येथील गार्डन हॉटेल ते ठाणा नाका फूटपाथचे काम पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन होऊन त्याचा वापर देखील होत आहे. परंतु, एक वर्षाच्या आतच या फूटपाथवरील रंगीत पेवर ब्लॉक खचले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच, अशा कामांच्या दुरूस्तीची जबाबदारी नक्की कोणाची? पनवेल पालिकेचे अधिकारी या कामांची पाहणी करतात की नाही? वेळेवर टॅक्स भरून देखील आमच्या वाटेला असा त्रास का? असे स्थानिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या निकृष्ठ कामांवर कारवाई होणार का, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.







