| सुधागड -पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी येथून जाणारे ग्रामस्थ तसेच पर्यटक यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी गौळमाळ येथील माजी उपसरपंच संतोष बावधाने हे सोमवारी (ता.16) पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. या बाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना दिले आहे.
पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर हा रस्ता पाच्छापूर गावांसह इतरही अनेक गाव आदिवासी वाड्या व धनगर वाड्या आदींना जोडतो. तसेच पाच्छापूर येथे असलेल्या सुधागड किल्लावर नियमित पर्यटक व इतिहासप्रेमी येत असतात. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांची गैरसोय होते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला व वाहून गेला आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर जाऊन खडी बाहेर आली आहे. अशा खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका आहे. अनेक बाईकस्वार या रस्त्यावर पडून अपघात झाले आहेत. शिवाय ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची अशी दुरावस्था झाली आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि या मार्गाची काम दर्जेदार व्हावे यासाठी संतोष बावधाने आमरण उपोषण करणार आहेत.