औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था

| चिपळूण | प्रतिनिधी |

औद्योगिक लोटे परशुराम वसाहतीमधील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. विविध कारणांसाठी खोदण्यात आलेले रस्ते ठिकठिकाणी खचले असून सर्वत्र चिखल झाला आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उद्योजक संघटनेने नुकतेच येथील एमआयडीसी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, औद्योगिक वसाहतीमध्ये आत येणारा एक्सल फाटा ते तलारी वाडी, तसेच तंत्र केम कंपनी समोरुन उद्योग भवनपर्यंतच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते ठिकठिकाणी खचले आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. यामुळे वारंवार खड्ड्यातून गाड्या घसरुन अपघात होत आहेत. त्यामुळे हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे. निवेदन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चिपळूणचे उपअभियंता आर.एस. पिंपळे व सहाय्यक अभियंता के.ए. हळदणकर यांना देण्यात आले आहे. यावेळी उद्योजक संघटनेच अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी, जनरल सेक्रेटरी राजकुमार जैन, खजिनदार मिलींद बारटक्के, संचालक डॉ. प्रशांत पटर्वधन, किसन चव्हाण, संकेत मेहता उपस्थित होते.

Exit mobile version