ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सेक्टर एक ते पाचपर्यंत सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याचा नाहक त्रास वाहन चालकांना होत आहे.
नवीन पनवेल शहरातील रस्ते काही महिन्यांपूर्वी बनवले होते. मात्र, पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात येथील खड्डे बुजवण्यात आले. परंतु, पुन्हा या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे नविन पनवेल परिसरात महापालिकाच्या भोंगळ कारभाराचा फटका करदात्या नागरिकांना सोसावा लागत आहे. नागरिकांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. पालिकेने संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. रस्त्यावरील डांबर थोड्याच महिन्यात निघून गेल्याने ठेकेदाराने कामात भ्रष्टाचार केला असल्याचे बोलले जात आहे. आदई गावाच्या कमानीजवळील रस्ता देखील खड्ड्यात गेला आहे. आदई सर्कलकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. संपूर्ण नवीन पनवेल शहरच खड्ड्यात गेल्याने पालिका काय करते, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून लवकरात लवकर खड्डे बुजवावे, अशी मागणी जोर धरत आहे.







