सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल

बेलापूर स्टेशन परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्या सिडको प्रशासनाला आपल्याच मुख्यालयाशेजारील रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही का? असा संतापजनक सवाल आता उपस्थित केला जात आहे. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, यामुळे सामान्य प्रवाशांचे आणि रिक्षा चालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रार करूनही सिडको याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एकविरा माता रिक्षा चालक-मालक संघटना (नवी मुंबई) यांनी केला आहे.

बेलापूर रेल्वे स्थानक (पूर्व), सेक्टर-11 आणि सकाळ भवन समोरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या खड्ड्यांमुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि आजारी व्यक्तींना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. अनेक वाहनचालकांना आणि रिक्षा चालकांना मणक्याचे आजार जडले आहेत. सिडको केवळ मोठे प्रोजेक्ट आणि त्यांच्या जाहिरातींमध्ये मग्न असून सामान्य जनतेच्या मूलभूत सोयींकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या मेगा प्रोजेक्टवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सिडकोला आपल्या अखत्यारीतील रेल्वे स्थानकांचे रस्ते नीट ठेवता येत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे. विमान प्रवास करणाऱ्यांसाठी गुळगुळीत रस्ते देणाऱ्या सिडकोला रेल्वेने प्रवास करणारे सामान्य नागरिक भिकारी वाटतात का? असा जळजळीत प्रश्न आता प्रवासी विचारत आहेत. रेल्वे स्थानकाच्या इमारतीत सिडकोची स्वतःची अनेक कार्यालये आणि 10 टॉवर्स असतानाही, आपल्याच दारात असणारे हे खड्डे प्रशासनाला दिसत नाहीत का, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

मोठमोठ्या प्रोजेक्ट्सचे प्रेझेंटेशन आणि प्रसिद्धीमध्ये मग्न असणाऱ्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एकदा वातानुकूलित कार्यालयातून बाहेर पडून सर्व रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करावी. तेथील रस्ते, स्वच्छतागृहांची दुरवस्था, परिसरातील घाण आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण याची प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

केवळ डेब्रिज टाकून मलमपट्टी?
रिक्षा संघटनेने यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही सिडकोने केवळ थातूरमातूर काम केले आहे. तक्रार केल्यावर खड्यांमध्ये केवळ डेब्रिज (कचरा/दगडाचा ढिगारा) टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार केला जातो, जो पावसाळ्यात किंवा काही दिवसांतच पुन्हा उघडा पडतो. यामुळे अपघातांचा धोका उलट वाढला आहे.
आंदोलनाचा इशारा
पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर बेलापूर रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करून ते सुस्थितीत केले नाहीत, तर एकविरा माता रिक्षा चालक-मालक संघटना सिडको प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

एकविरा माता रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सजग नागरिक मंच नवी मुंबईच्या निदर्शनास रस्त्यांची दुरवस्था लक्षात आणून दिली. त्यानंतर मंचाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन पाहणी केली असून सदरील ठिकाणचे रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे आढळून आले आहेत.

– विनय मोरे, सदस्य सजग नागरिक मंच, नवी मुंबई

Exit mobile version