स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर प्रश्नचिन्ह; सजग नागरिक मंचाने केली पोलखोल
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई शहराला केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात देशात दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविले आहे. परंतु, याच शहरातील प्रमुख स्टेशन असणाऱ्या बेलापूर रेल्वे स्टेशन परिसराची दुरवस्था पाहता या पुरस्काराच्या निकषांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सजग नागरिक मंचाच्या सदस्यांनी प्रत्यक्षात बेलापूर परिसराला भेट दिली असता अनेक समस्या समोर आल्या आहेत. स्टेशनमधील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचणे, तीन महिन्यांपूर्वी केलेल्या डांबरी रस्त्याची दुरवस्था, अर्बन हटच्या भिंतीच्या कोसळण्याचा धोक्यामुळे रेल्वे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन ये-जा करणे, अस्वच्छता व दुर्गंधी यामुळे रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच, स्टेशन परिसराला फेरीवाल्यांचा विळखा व त्यामुळे रेल्वे प्रवाशांना स्टेशनमध्ये ये-जा करताना होणार त्रास, स्टेशन परिसरात अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉकस खचल्याने पडलेले खड्डे व असमतल रस्ते अशा अनेक समस्या निदर्शनास आल्या आहेत.
रेल्वे प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त करत म्हटले आहे की, भविष्यात केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान निरीक्षण समितीने महानगरपालिका अधिकारी दाखवतील तीच स्थळे पाहून गुण देण्याऐवजी, प्रत्यक्ष नागरिकांना समवेत घेऊन सर्व परिसराची सखोल पाहणी करावी. अन्यथा केवळ झापडबंद पद्धतीने तपासणी करून शहराला क्रमांक देण्याचा प्रकार हा वास्तव लपविणारा व स्वच्छ शहराच्या बाबतीत दिशाभूल करणारा ठरतो. तसेच, स्टेशन परिसर हा सिडकोच्या अंतर्गत येत असल्याने व स्वच्छ सर्वेक्षण अभियान हे महापालिकेचे आहे, अशी ढाल पुढे करणे उचित ठरणार नाही. कारण स्टेशन परिसर हा शहराचा अत्यंत महत्वपूर्ण असा भाग असतो.
वर्तमानात स्वच्छ सर्वेक्षणातील नागरिक सहभाग केवळ दिखावा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या वेळी नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांकडून काही नळीने फॉर्म्स भरून घेतात. या प्रक्रियेत नागरिकांना केवळ हो किंवा नाही असे उत्तर देण्यापुरतेच मर्यादित केले जाते. प्रत्यक्ष नागरिकांची मते, सूचना किंवा तक्रारी लक्षात घेतल्या जात नाहीत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा खरा चेहरा नागरिकांसमोर येत नाही.
सिडको प्रशासनावर प्राथमिक जबाबदारी
सिडको प्रशासनाने रेल्वे स्टेशन परिसराच्या देखभालीची जबाबदारी अत्यंत जबाबदारपणे पार पाडावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. बेलापूर स्टेशन परिसराची प्राथमिक जबाबदारी सिडको प्रशासनावर आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी डोळस पाहणी करून तातडीने सुधारणा कराव्यात. अन्यथा नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता व सोयीसुविधा धोक्यात राहतील.
नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन इमारती व परिसरातील पायाभूत सुविधांची सिडकोच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करावी. त्याचबरोबर मागील 3 वर्षात नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन ईमारत व परिसर देखभाल खर्चावरील श्वेतपत्रिका काढून तिचा तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर अपलोड करावा.
. सुदीप शहा, सदस्य, सजग नागरिक मंच, नवी मुंबई







