क्रीडा संकुलाची दुरवस्था; उदयोन्मुख खेळाडूंच्या स्वप्नांना ग्रहण
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने बोर्ली पंचतन येथे उभारण्यात आलेल्या श्रीवर्धन तालुका क्रीडा संकुलाची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे.संपूर्ण मैदानावर 3 ते 4 फूट उंचीची झुडपे आणि गवत वाढल्याने क्रीडा संकुलाचे रूपांतर रानात झाले आहे. मैदानावर सराव करायचा कुठे आणि आम्ही घडायचे कुठे, असा प्रश्न उदयोन्मुख खेळाडूंकडून केला जात आहे.
एकीकडे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये संधी मिळवून देण्याच्या घोषणा केल्या जातात , मात्र दुसरीकडे सरावासाठी असलेल्या मैदानाची साधी स्वच्छताही केली जात नसल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याने खेळाडूंची गैरसोय अधिकच वाढली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे उदयोन्मुख खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे.
मैदान नाही, तर सराव नाही; सराव नाही, तर प्रगती कशी?
खेळाडूंच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे ही कौशल्य विकसित करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची असतात. मात्र, सरावासाठी मैदानच उपलब्ध नसेल, तर त्यांच्या मेहनतीला दिशा मिळणार कशी? नियमित सराव खंडित झाल्यास स्पर्धात्मक तयारीवर परिणाम होऊ शकतो. इतर ठिकाणच्या खेळाडूंशी स्पर्धा करताना श्रीवर्धनच्या गुणवंत खेळाडूंना मागे पडण्याची वेळ येऊ शकते.काही खेळाडूंची क्रीडा क्षेत्रातील वाटचालच खंडित होण्याची भीती नाकारता येत नाही.
प्रशासनाची जबाबदारी नेमकी कुठे आहे?
क्रीडा संकुलाची देखभाल, मैदानाची नियमित स्वच्छता आणि खेळाडूंना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे.मैदानाची अशी अवस्था होईपर्यंत देखभाल का झाली नाही? नियमित पाहणी होते का? पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
श्रीवर्धन तालुका क्रीडा संकुलातील झुडपे तातडीने हटवून मैदान खेळण्यायोग्य करावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि आवश्यक क्रीडा साहित्य व नियमित देखभाल उपलब्ध करून द्यावी.अन्यथा खेळाडूंच्या हक्काच्या सुविधांसाठी युवासेना आक्रमक भूमिका घेईल.
– निकेत मंगेश कोसबे
युवासेना तालुका अधिकारी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रीवर्धन
