22 कोटींचा प्रस्ताव लालफितीत अडकून
| रायगड | प्रमोद जाधव |
दुर्लक्षामुळे अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना, विविध दुरुस्तीच्या कामांसाठी पाठविण्यात आलेला तब्बल 22 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असला तरी अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे संकुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
क्रीडा संकुलातील विविध सुविधांची दुरुस्ती आणि देखभाल रखडल्याने खेळाडूंना मूलभूत क्रीडा सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विविध स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंनाही उपलब्ध सुविधांच्या अभावामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्ह्यातील भौगोलिक रचना खेळाडूंसह उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी पोषक असल्याचे कायमच बोलले जाते. कबड्डीसह वेगवेगळे खेळ रायगड जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर खेळले जातात. शाळा, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमधून खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे रायगड जिल्ह्याला खेळाडूंची खाण म्हणून बोलले जाते. जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाची देखभाल वेळेत होणे अपेक्षित असताना, 22 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. शासनाच्या मंजुरीनंतरच संकुलातील विविध कामांना गती मिळणार आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत, म्हणून अलिबागमध्ये 23 वर्षांपूर्वी जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले. गोंधळपाडा येथील संगम या परिसरात सुमारे 12 एकर जागेमध्ये हे संकुल बांधण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालयासह खेळाडूंसाठी वसतिगृह, जिमखाना, बॅडमिंटन कोर्ट, प्रेक्षक गॅलरी, धावपट्टी, व्हॉलीबॉल, जलतरण तलाव, लांब उडी, क्रिकेट अशा वेगवेगळ्या इनडोअर व आऊट डोअर खेळांसाठी मैदाने उभारण्यात आली होती.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून या जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर निवडणुकीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. त्याचा परिणाम स्थानिक खेळाडूंना या संकुलाचा फारसा उपयोग झाला नाही. पुरेशी सुविधा, अद्ययावत क्रीडा संकुलाअभावी रायगड जिल्ह्यातील खेळाडू खेळापासून आणि देश, राज्य पातळीवर संधीपासून वंचित आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. धावपट्टी खराब झाली असून, त्याठिकाणी आता गवताने विळखा घातला आहे. वसतिगृह, बॅडमिंटन कोर्ट जीर्ण झाले आहे. काही ठिकाणी गळतीचा त्रास होत आहे. जलतरण तलाव खराब झाले आहे. तेथील लादी निघाली आहे. खेळाडूंसह क्रीडाप्रेमींच्या मागणीनंतर जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून शासनाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सुमारे 22 कोटी प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला असल्याची माहिती जिल्हा कीडा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये 400 मीटरचा सिंथेटीक ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, वसतिगृह, जलतरण तलाव आणि कार्यालयाची दुरुस्ती केली जाणार आहे. मात्र, या क्रीडा संकुलाच्या दुुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकून बसल्याची माहिती समोर येत आहे. शासनाच्या दुर्लक्षपणाचा फटका खेळाडूंना बसत आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव, महाड, पेण, पनवेल, रोहा, सुधागड या नऊ तालुक्यातील क्रीडा संकुलांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी तीन कोटी अशा एकूण 27 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
तीन क्रीडा संकुलासाठी जागेचा प्रश्न ऐरणीवरच
प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल असावे, ग्रामीण भागातील खेळाडू हक्काचे मैदान मिळावे, म्हणून प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल बांधण्याची संकल्पना शासनाने प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अलिबाग, मुरूड व पोलादपूर तालुक्यात क्रीडा संकुलसाठी जागाच मिळत नसल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील खेळाडू सुविधांपासून व खेळापासून दूर असल्याची माहिती समोर येत आहे.
जागा असूनही संकुलाचा अभाव
रायगड जिल्ह्यातील उरण, खालापूर, कर्जत या तीन तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुुलसाठी जागा उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधीच्या मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडू प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. उरणमधील क्रीडा संकुलसाठी पाच कोटी, कर्जत आणि खालापूरसाठी प्रत्येकी तीन कोटी अशी एकूण 11 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. शासनाकडून वेळेवर निधीची मान्यता मिळत नसल्याने जागा असूनही संकुलाचा अभाव अशी परिस्थिती या तालुक्यात झाली आहे.
अलिबागमधील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे 22 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यत आला आहे. उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांमध्ये क्रीडा संकुलाची इमारत उभारण्यासाठी जागा आहे. शासनाकडे निधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे. तसेच नऊ तालुक्यांतील क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून निधीचा प्रस्ताव महिन्याभरात प्राप्त झाल्यास दोन महिन्यांत कामांची निविदा काढून तातडीने दुरुस्तीची व नव्या संकुलाची कामे केली जातील. जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुुरुस्तीसाठी साधारणपणे 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर होण्याची अपेक्षा आहे.
– प्रकाश वाघ,
जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड






